Exclusive : खैरे झकास आणि औरंगाबाद भकास, उत्तमसिंग पवारांचा आरोप; मनपाची तुलना केली पाकिस्तानसोबत

Foto

औरंगाबाद – औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार खैरेंना पुन्हा एकदा आव्हान देण्यासाठी उत्तमसिंग पवार मैदानात उतरले आहेत. खासदार चंद्रकांत खैरेंनी औरंगाबादचा कंगाल पाकिस्तान करुन टाकला असल्याची जहरी टिका त्यांनी केलीआहे. शहराचा कचरा करुन ते मात्र झकास असल्याचा आरोप माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी केला आहे. औरंगाबाद महानगर पालिकेची तुलना त्यांनी पाकिस्तानसोबत केली असून या कंगाल महापालिकेसाठी शिवसेना आणि खासदार खैरे जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

लोकसभा निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. जिल्ह्यातील राजकीय नेते सक्रिय होत चालले आहेत. बुधवारी औरंगाबाद शहरात दोन राजकीय नेत्यांचे वाढदिवस साजरे झाले आणि या दोन्ही ठिकाणी हजेरी लावली ती जालन्याचे माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी. त्यासोबतच धार्मिक गुरु शांतिगिरी महाराज यांचीही त्यांनी भेट घेतली. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून उत्तमसिंग पवार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाले. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पवार हे सक्रिय झाल्याची चर्चा आहे. यानिमित्ताने सांजवार्ता ऑनलाईनने उत्तमसिंग पवारांकडूनच त्यांची आगामी रणनीती जाणून घेतली. यावेळी त्यांनी खासदार खैरेंमुळे औरंगाबाद शहर भकास झाल्याचा आरोप केला. त्यासोबतच कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर २०१९ची निवडणूक लढवण्याचीही इच्छा व्यक्त केली.

खैरे झकास, औरंगाबाद भकास

औरंगाबादमध्ये यावर्षी पाऊस चांगला झाला नाही म्हणून खैरे अजून सहीसलामत आहेत, असे सांगत माजी खासदार पवार म्हणाले, पाऊसाने जोर धरला असता तर शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे रोगराई पसरून लोकांचे जीवन धोक्यात आले असते. साथीचे रोग पसरले असते आणि लोकांनी लोकप्रतिनिधींना फिरणे अवघड करुन टाकले असते. महापालिकेत २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे, मात्र नियोजन शब्दाचा अर्थ त्यांना अजून कळलेला नाही.’ २००९ मध्ये औरंगाबाद लोकसभा निवडणूकीत खैरेंना कडवी झुंझ देऊन ३२ हजार मतांनी पराभूत झालेले उत्तमसिंग पवार म्हणाले, खासदार खैरे झकास आहेत मात्र त्यांनी औरंगाबाद जिल्हा भकास करुन टाकला आहे. मागील पाच वर्षात एकही नवा उद्योग औरंगाबादमध्ये येण्यास तयार नाही. त्यामुळे येथील तरुणांच्या हाताला रोजगार नाही. शहराच्या कचरा आणि पाण्याचा प्रश्न ते सोडवू शकलेले नाही. नागरिकांना आठवड्यात दोन तास पाणी देखील ते देऊ शकले नाही. देश पातळीवरील एकही शिक्षण संस्था जिल्ह्यात आलेली नाही.

औरंगाबादची तुलना पाकिस्तानसोबत

पाकिस्तान या कंगाल राष्ट्रासारखी औरंगाबाद महापालिका झाली असल्याची टीका उत्तमसिंग पवार यांनी केली. ते म्हणाले, शिवसेना आणि चंद्रकांत खैरे यांनी  महानगर पालिकेची स्थिती पाकिस्तानसारखी करुन टाकली आहे. ही महापालिका कंगाल झाली आहे. बँक करप्ट म्हणता येईल अशी पालिकेची आवस्था आहे. महापालिकेची दुर्दशा केली आहे. शहरामध्ये ऐतिहासिक असे ५२ दरवाजे आहेत. त्यांची आवस्था यांच्या नियोजन शुन्यतेमुळे मोडकळीस आली आहे. ऐतिहासिक वारसा पुसून टाकण्याचे काम खासदार खैरे आणि त्यांची सत्ता असलेली महापालिका करत असल्याचा आरोप पवारांनी केला.

उत्तमसिंग पवार हे सध्या कोणत्याही पक्षात नसले तरी शिवसेना-भाजपसोडून इतर कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षाकडून लढण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. काँग्रेसच्याही ते संपर्कात असल्याचे ते म्हणाले.